दिनांक :- २९ जुलै २०१९

dagdusheth ganapati सर्वांना आपलेसे करणारा वारकरी संप्रदाय-
ह.भ.प.बाबामहाराज सातारकर; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे चातुर्मासानिमित्त हरिपाठावरील प्रवचनाचे आयोजन; पुणेकरांना विनामूल्य प्रवेश

पुणे : हजारो वर्ष टिकून असणाºया वारकरी संप्रदायाने सर्वांना आपलेसे केले आहे. सर्व लोक पांडुरंगाच्या भक्तीत एकरूप होऊन एकत्र येतात आणि पांडुरंगाच्या भेटीला जातात. यामध्ये भेदभाव केला जात नाही. फक्त हरिचे नामस्मरण करीत पांडुरंगाच्या भेटीची ओढ प्रत्येकाला असते. साडेसातशे वर्ष चढत्या क्रमाने वारी चालू आहे, त्यामुळे या संप्रदायातील ताकद दिसून येते. सर्वांना आपलेसे करणारा वारकरी संप्रदाय असून सर्वांगाने परिपूर्ण असा संजिवन संप्रदाय आहे, असे मत प्रवचनकार ह.भ.प बाबा महाराज सातारकर यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे चातुर्मास सोहळ्यानिमित्त सातारकर यांच्या प्रवचनाचे आयोजन स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठावर ते निरुपण करीत आहेत.

ह.भ.प बाबा महाराज म्हणाले, परमेश्वर आपल्याबरोबर असताना आपल्याला कोणत्या गोष्टीची चिंता नको. परंतु अनेक लोक म्हणतात परमेश्वर बरोबर असताना देखील संकटे का येतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. जीवनात संकटे येणारच परंतु भगवंताच्या संगतीत त्याचे निवारण करण्याची ताकद आपल्याला मिळते. भगवंताची ही संगती अनुभविण्यासाठी साधु संतांच्या संगतीत रहावे. आपल्या काय वाटते यावर काही अवलंबून नसते, सर्व सूत्र परमेश्वराच्या हाती असतात. त्याच्या मनात जे असते त्याला आपण शरण जावे आणि त्याच्याशी एकरूप व्हावे.

पुढे ते म्हणाले, साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठायीच मुराला अनुभवे… या अभंगाच्या ओवीत संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जो पुस्तकातून ज्ञान देतो तो पंडित आणि जो अनुभवातून ज्ञान देतो तो साधू असतो. अनुभवाच्या माध्यमातून जी जाणिव प्रगट होते त्याला बोध म्हणावे. साधुजवळ प्रत्येक गोष्टीचा बोध असतो. पांडुरंगाला पाहिल्यानंतर डोळ््यातून आनंदाश्रू येतात म्हणजे अनुभव. अनुभवातून माणूस बोलतो तेव्हा त्याचे शब्द ताकदीने पुढे येतात, त्याला साधु म्हणावे. विश्वात्मक भगवंत ही दृष्टी संतांची असते. जगाच्या कल्याण्याचे वाड्.मय ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले म्हणून ते संत आहेत.

हे प्रवचन दिनांक १९ आॅगस्ट पर्यंत दररोज सायंकाळी ७ ते ८ या वेळेत होणार आहे. महिनाभर सुरु राहणा-या या प्रवचनाला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे चातुर्मास सोहळ्यानिमित्त ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांच्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठावर प्रवचनाचे आयोजन स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. यावेळी बोलताना ह.भ.प.बाबा महाराज सातारकर.

B05