दिनांक :- ६ जून २०१९

dagdusheth ganapati
शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ ला ११ हजार फळांचा नैवेद्य
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन; गणरायाच्या पाताळातील गणेश जयंतीनिमित्त मंदिराला आकर्षक सजावट

पुणे : केळी, डाळींब, आंबे, पेर, चिक्कू, अंजीर ,अननस, फणस, द्राक्षे, संत्री, मोसंबी, टरबूज, लिची अशा विविधरंगी फळांचा महानैवेद्य दगडूशेठ गणपतीला दाखविण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात तब्बल ११ हजार फळांचा नैवेद्य दाखविण्यात आला. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. त्यामुळे मंदिरावर फुलांच्या आकारातील शेषनागांची आकर्षक आरास करण्यात आली होती. फळांच्या नैवेद्याने सजलेली आरास आणि मंदिरावरील आकर्षक सजावट पाहण्यासाठी गणेशभक्तांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.

गणेश जयंतीनिमित्त मंदिरात गुरुवारी पहाटे ४ वाजता गायक राजू बर्वे यांचा स्वराभिषेक हा गायनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सकाळी ८ वाजता महागणेश व सत्यविनायक पूजा पार पडली. दुपारी गणेश कथाकार ह.भ.प. रुक्मिणी आई तारु महाराज यांचे कीर्तन झाले. तर, सायंकाळी सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांच्या हस्ते विशेष महाआरती करण्यात आली. शिवराज्याभिषेक दिन असल्याने शिवरायांना मानवंदना देणारा जिरेटोप आणि फळांच्या माध्यमातून केलेली आरास विशेष आकर्षण ठरली.

भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्याच सृष्टीवर मोहित झाले. त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून एक बालक जन्माला आले. त्याच्याकडे पाहिल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अधिकच मायायुक्त झाले. परिणामी आपल्या नव्या अपत्याला त्यांनी मायाकर असे नाव दिले. अनेकानेक वरदान देऊन त्याला परिपुष्ट केले. पुढे विप्रचित्ती नामक राक्षसाने या मायाकराला राक्षसांचा राजा केले. मायाकराने आपल्या अतुलनीय वरदानांच्या भरवशावर सगळी पृथ्वी आणि स्वर्ग लोक जिंकले. त्यानंतर त्याने पाताळावर आक्रमण केले. त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी शेवटी भगवान गणेशांचे स्मरण केले.

श्रीशेष ध्यान करत असतांना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश श्रीशेषात्मज रूपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला मध्यान्य समयी प्रकट झाले. याच अवतारात पुढे गजासुर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर ,देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तिने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितले. या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुर वध केल्यामुळे याच श्रीशेषात्मज अवताराला श्रीमूषकग असे पण नाव प्राप्त झाले. गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात ११ हजार फळांचा नैवेद्य दाखविण्यात आला. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. त्यामुळे मंदिरावर फुलांच्या माध्यमातून शेषनागाच्या प्रतिकृतींची आरास करण्यात आली.

F03
F02
F08
F09
F05
F11
F01
F06