अनेक वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीत आपला एकुलता
एक पुत्र गमावल्यानंतर श्री. दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी ह्या गणेशमूर्तीची
प्रतिष्ठापना केली. दरवर्षी केवळ दगडूशेठ यांचे कुटुंबच नव्हे, तर आसपासच्या परिसरातील सर्व मंडळी
अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत असत. त्यावेळी ऐन तारुण्यात असलेले
तात्यासाहेब गोडसे हे ह्या गणेशोत्सवाचे एक उत्साही कार्यकर्ते होते. नंतरच्या काळात जेव्हा
लोकमान्य टिळकांनी, स्वातंत्र्य-चळवळीसाठी लोकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजिनिक
उत्सवाचे स्वरूप दिले, तेव्हा दगडूशेठ गणपतीला पुण्यातील सर्वाधिक लोकप्रियतेचे आणि आदराचे स्थान
मिळाले.
१९५२ साली दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर-उत्सवाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी तात्यासाहेब आणि त्यांच्या
मित्रमंडळींवर येऊन पडली. तात्यासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे सहकारी मामासाहेब रासणे, अॅड.
श्री. शंकरराव सूर्यवंशी आणि श्री. के. डी. रासणे या मंडळींनी हा उत्सव अत्यंत चोखपणे पार पाडला.
आणि त्यानंतर ह्या मंडळाने कधी मागे वळून पाहिलेच नाही! भक्तांनी आणि दानशूर दात्यांनी मंदिराच्या
फंडासाठी उदारहस्ते देणग्या द्यायला सुरुवात केल्यावर तात्यासाहेब आणि त्यांचे मित्र यांना वाटू
लागले की ह्या पैशांतून आपल्याच बांधवांची सेवा करण्याहून अधिक मोठी ईश्वर-सेवा काय असू शकणार?
लौकरच ह्या ध्येयवेड्या तरुण कार्यकर्त्यांनी उत्सवाच्या कार्याची व्याप्ती पारंपरिक पूजाअर्चेच्या
पलिकडे नेऊन सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. मंदिरातले धार्मिक विधी
थाटामाटाने साजरे करत असतानाच या तरुणांनी आपल्या राज्याच्या सामाजिक व राजकीय प्रश्नांकडे लक्ष
वळवले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट्च्या अखत्यारीत त्यांनी कितीतरी सामाजिक कार्यांचा प्रारंभ
केला. वंचित मुलांना शैक्षणिक आणि आर्थिक मदत, छोटे उद्योगधंदे करू इच्छिणाऱ्यांना किंवा
फेरीवाल्यांना सुवर्णयुग सहकारी बँकेमार्फत आर्थिक सहाय्य, वृद्धाश्रम, वीटभट्टी-कामगारांचे
पुनर्वसन ही नमुन्यादाखल काही उदाहरणे.
आज श्रीगणेशांच्या आशीर्वादाने ’श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’ हा एक आघाडीची
संस्था म्हणून समृद्ध झाला आहे. मानवजातीची सेवा हीच परमेश्वराची सेवा या भावनेने काम करण्याचे
समाधान मोठे आहे.
वॉलपेपर
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट गणेश आहवाल २०२३ ची PDF डाउनलोड करण्यासाठी